मुंबई : गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही असं आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.


निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी कशी मदत केली होती?



  • निसर्ग चक्रीवादळाच्या वाढीव नुकसान भरपाईचा सुधारित आदेश जारी केला होता. वाढीव नुकसान भरपाई देण्याचा राज्य सरकारचा आदेश होता.

  • अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठी 15 हजार रुपये मदत दिली होती, त्यात बदल करून 25 टक्क्यापेक्षा जास्त घराचे नुकसान झाले असल्यास 25 हजार.

  • 50 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास 50 हजार व पूर्ण घराचे नुकसान झाले असल्यास दीड लाख रुपये मदत मिळणार.

  • अन्नधान्य भिजले असल्यास आणि भांड्यांचे नुकसान झाले असल्यास 10 हजार रुपये मदत देण्याचा सुधारित आदेश.

  • अंशतः नुकसान झालेल्या बोटींसाठी 4 हजार ऐवजी आता 10 हजार रुपये भरपाई मिळणार.

  • बोटीचे पूर्ण नुकसान झाले असल्यास 10 हजार रुपयांवरून 25 हजार रुपये वाढीव मदत.

  • मच्छिमारांच्या जाळीचे नुकसान झाले असेल तर 2500 वरून 5 हजार रुपये वाढीव मदत.

  • पूर्ण जाळीचे नुकसान झाले असेल तर पूर्वी 5 हजार मदत मिळायची आता 10 हजार मदत मिळणार.

  • कुटुंबांना कपडे व भांड्यांसाठी प्रत्येकी 5 हजार प्रमाणे एकूण 10 हजार रुपये मदत मिळणार आहे. 

  • बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीपोटी पूर्वी 18 हजार रुपये प्रतिहेक्टर, दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत मिळत होते. त्याऐवजी आता प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांप्रमाणे कमाल दोन हेक्टरसाठी मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.


इतर संबंधित बातम्या