Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar: भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापनदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. महाराष्ट्रातील शिवांगी काळे, जुई केसकर, जिया राय, स्वयम पाटील आणि कामेश्वर वाघमारे यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रधानमंत्री बाल पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलंय. 


प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पुरस्कार विजेत्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. जळगाव येथील शिवांगी काळे हिने 'वीरता’ या श्रेणीमध्ये, पुण्याच्या जुई केसकर हिने 'नव संशोधन' मध्ये आणि मुंबईतील जिया राय, तसेच नाशिकच्या स्वयंम पाटील याने 'क्रीडा' श्रेणीमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार पटकावला आहे. या सर्वांचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी हार्दिक अभिनंदन केलंय. 


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रधानमंत्री बाल पुरस्कार विजेत्या सर्व बालकांचं अभिनंदन केलंय. महाराष्ट्र ही शूरांची-वीरांची, कर्तृत्ववानांची, नवनिर्माणाचा ध्यास असलेल्यांची भूमी आहे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’  विजेत्या बालकांनी हे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. या बालकांची कामगिरी अन्य बालकांसह सर्वांना राष्ट्रनिर्मितीसाठी प्रेरणा देणारी ठरेल, असे गौरवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरस्कार विजेत्या बालकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


महाराष्ट्राच्या बालकांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’चे मानकरी ठरताना प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. या पुरस्कार विजेत्या बालकांमुळे महाराष्ट्राचा सन्मान वाढला आहे. या बालकांच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे, नातेवाईकांचे, मार्गदर्शकांचे, हितचिंतकांचेही अजित पवारांनी अभिनंदन केलंय.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha