मुंबई : राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असला तरी आपण यासाठी तयारी केली आहे. काही लोक यातही राजकारण करत आहेत. ही वेळ राजकारण करण्याची नाही. घाणेरडे राजकारण करत आहेत ते त्यांना करु द्या. मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि त्यावर सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. सत्ता येते जाते, पण जीव गेला तर परत येत नाही, असंही ते म्हणाले.


ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे आपण कोरोनाचा गुणाकार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोनाची वाढ आपण काही प्रमाणात नियंत्रणात ठेवली आहे. मात्र, या लढाईत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांनी मी आंदराजली वाहतो. आपल्यासाठी लढताना दोन पोलीस शहीद झाले आहेत. त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करू, पण माणूस गेला आहे. डॉक्टरांसह पहिल्या फळीतील कर्मचारी आणि अधिकारी जीव धोक्यात घालून तणावाखाली काम करत आहेत, त्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, सगळे दिवस आता सारखे झालेत. सर्व दिनदर्शिका दीन झाल्या आहेत. उगवणारा दिवस विचारतोय काय होणार आज आणि मावळणारा दिवस म्हणतोय आज काय झालं?. यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या तसेच अक्षयतृतीयेच्या देखील शुभेच्छा देखील दिल्या.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मी सर्वधर्मियांना धन्यवाद देतो. आपापल्या धार्मिक सणांना त्यांनी बाजूला ठेवलं आहे. ह्या सगळ्या काळात सर्वधर्मीयांची धर्मस्थळं बंद आहेत. मग तुम्ही म्हणाल की देव कुठं आहे? तुम्ही जो संयम पाळता त्यात देव आहे. डॉक्टर्स, पोलिस, सफाई कामगार अशा सर्व सेवा देणाऱ्यांमध्ये देव आहे. यांचा आदर करणं हीच देवांना खरी मानवंदना आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ते म्हणाले की, राज्यात अडकलेल्या परप्रातियांना आम्ही हळू हळू घरी पाठवण्याची व्यवस्था करु. संयम ठेवणे गरजेचे आहे. हा विषाणू आपला संयम कधी तुटतोय याची वाट पाहतोय, असंही ते म्हणाले.