Eknath shinde : आम्ही जी आश्वासनं देतो, ती सगळी अश्वासनं पूर्ण करतो, मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे, जगामध्ये माझ्यासारखा मुख्यमंत्री पाहिलाय का?,असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेला विचारला आहे. ते म्हणाले की, मी रस्त्यावर फिरणारा मुख्यमंत्री आहे. मुंबईत मी नालेसफाई झाली की नाही हे अगदी स्पॉटवर जाऊन पाहतो. राज्यात कुठंही गाडी थांबव म्हटलं तरी रस्त्यावर थांबून मी प्रत्येकाला भेटतो. आजवर जगामध्ये असा मुख्यमंत्री तुम्ही कधी पाहिलंय का?, आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आतापर्यंत बघा, आम्ही सगळं पूर्ण करतोय. हे सरकार खोटं नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यासोबतच इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण केलं जाणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. पिंपरी-चिंचवडमध्ये आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. य़ा कार्यक्रमात ते बोलत होते.
'इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण केली जाणार'
मागील काही महिन्यापासून इंद्रायणी नदीत प्रचंड प्रमाणात प्रदूषण असल्याचं समोर आलं आहे. या नदीत केमिकल युक्त पाणी सोडलं जात होतं. त्यामुळे आळंदीकरांच्या जीवाशी खेळ सुरु होता. त्यामुळे आता इंद्रायणी नदीचं शुद्धीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यंमत्री यांनी सांगितलं. ते म्हणाले की, पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प उभारण्याच्या सूचना उद्योगमंत्री उदय सामंतांना दिलेल्या आहेत. यानिमित्ताने इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीचं शुद्धीकरण केलं जाईल. आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला आळंदीमध्ये इंद्रायणी नदीतील पाण्यावर फेस आला होता. वारकऱ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ माध्यमांनी समोर आणला होता. पिंपरी चिंचवडमधील कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीत सोडत असल्यानं इंद्रायणी दूषित झाली होती. त्या अनुषंगाने नदीचं शुद्धीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
'जाहिरातीने तुटेल इतकी ही कच्ची युती नाही'
जाहिरातींमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही एकदम मजबूत आहोत. ही युती एका विचाराने निर्माण झाली आहे. ती एखाद्या जाहिरातीने तुटेल इतकी ही कच्ची युती नाही. एकाने सर्वेक्षण केलंय त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला पसंती मिळतीये. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 80 टक्केपेक्षा जास्तीची पसंती मिळाली.
'आम्हाला विरोधक घाबरले'
आमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. हे सगळे निर्णय पाहून विरोधक घाबरले आहेत. अकरा महिन्यात युती सरकारने एवढं काम केलं आणखी दीड वर्षात हे चांगलं काम करणार, म्हणून विरोधक काहीही आरोप करत आहेत. त्यांना आम्ही कामातून उत्तर देणार आहोत. तुम्ही त्याबाबत काहीही चिंता करू नका, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.