बुलडाणा/ मुंबई : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत उभारण्यात आलेल्या घराचं बुलडाण्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्गाटन करण्यात आलं. मात्र उद्घाटनानंतर आजीबाईनं केलेल्या आरोपामुळं संपूर्ण पंतप्रधान आवास योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

बुलडाणाच्या आसलगावातील वृद्ध महिला गीताबाई दांडेकर यांना पंतप्राधान आवास योजनेअंतर्गत 1 लाख 50 हजार 090 रुपये किमतीचे घरकुल मंजूर झालं. त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात झालं. यानिमित्त मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय अधिकाऱ्यांचा भला मोठा ताफा गीताबाईंच्या घरी आला होता.

मुख्यमंत्र्यांनी गीताबाईंच्या घराचं उद्घाटन केल्यानंतर त्याच घरात घटकाभर आराम केला, फोटो काढण्याचे सोपस्कार पूर्ण झाले. आणि परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र आपण ज्या घराचं उद्घाटन केलं, त्या घरासाठी लाभार्थीला पूर्ण अनुदानच मिळालेलं नाही, याची मुख्यमंत्र्यांना कदाचित कल्पना नव्हती.

कारण पंतप्रधान आवास योजनेसाठी दीड लाख नव्हे, तर फक्त 30 हजार रुपयेच अनुदान मिळाल्याचं गीताबाई दांडेकरांनी सांगितलं आहे.

त्यामुळे गीताबाई दांडेकरांना घरासाठी पूर्ण अनुदान मिळालं नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाची घाई कशासाठी केली. हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आणि जर आता श्रेय घेतलंच आहे, तर आजीबाईंना अनुदानाची पूर्ण रक्कम मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री जातीन लक्ष घालतील का? हा मुख्य प्रश्न आहे.

कारण, गीताबाईंच्या घराचे बांधकाम फक्त शासनाच्या मदतीवर झालं नसून, त्यासाठी उरलेले पैसे जमवण्यात त्यांना मोठी दमछाक करावी लागली आहे. यासाठी त्यांनी पै-पाहुणे, शेजारी, ओळखीचे अशा सर्वांकडून उसनवार करुन उर्वरित रक्कम उभा केल्याचं गंगाबाईंचं म्हणणं आहे.  आज त्याच घरावर शासना प्रशासनने आपली पाठ थोपटून घेतल्यानं, सरकारची ही घिसाडघाई हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, या प्रकरणी राज्य सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थीला चार टप्प्यात पैसे दिले जातात. गीताबाई यांना दुसऱ्या टप्प्यातील पैसे येत्या तीन ते चार दिवसात पोहचवण्याची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. या योजनेत संपूर्णपणे पारदर्शकता राखली गेली आहे. त्यासाठी कोणीही व्यक्ती याची ऑनलाईन माहिती मिळवू शकतं.