मुंबई : शिवार संवाद यात्रेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर रात्री 10 वाजता होणाऱ्या या बैठकीत शिवार संवाद यात्रेतील कामाचा आढावा घेतला जाणार आहे.
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंत्र्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. शिवार यात्रेत शेतकऱ्यांकडून आलेल्या सूचनांवरही विचार होणार आहे. शेतकऱ्यांच्या सूचनांवर विचार करुन त्यासाठी खास धोरण आखलं जाणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी शिवार संवाद यात्रा हा कार्यक्रम आखण्यात आला होता. यामध्ये भाजपच्या प्रत्येक मंत्र्यावर विविध भागांची जबाबदारी देण्यात आली होती.
सरकारच्या योजना गावांपर्यंत पोहोचतात का, योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का, शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या योजनांची आवश्यकता आहे, अशा गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी शिवार संवाद यात्रा हा कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यानुसार मंत्र्यांकडून त्याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या सूचनांवर विचार करण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले.