नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. नागपुरातील हसन बाग परिसरातील काँग्रेसच्या प्रचार सभेदरम्यान ही घटना घडली आहे.

काँग्रेसची प्रचार सभा सुरु असताना एक व्यक्ती मंचावर चढला आणि 'काँग्रेस मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या विरोधात घोषणा देत त्या व्यक्तीने अशोक चव्हाणांवर शाई फेकली. त्यामुळे सभेच्या स्थळी एकच गोंधळ उडाला.

दरम्यान शाई फेक करणाऱ्या व्यक्तीला उपस्थित कार्यकर्त्यांकडून जोरदार मारहाण करण्यात आली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी तातडीने सुरक्षित स्थळी हलवलं. शाईफेक करणारा व्यक्ती काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे. काँग्रेसशी संबंधीत माथाडी संघटनेचा नेता ललित बघेल असं त्याचं नाव आहे.

पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्तांच्या तावडीतून ललित बघेलला सोडवत अटक केलं आहे. सभेच्या स्थळी सुरक्षेचाही मोठा अभाव दिसून आला. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करताना त्याला सोडवण्यासाठी केवळ एक ते दोन पोलिस कर्मचारी होते.

शाईफेकीला काँग्रेसची अंतर्गत गटबाजी कारणीभूत?

तिकीट वाटपावरून नागपूर काँग्रेसमध्ये जी नाराजी दिसून आली आहे, त्याचीच किनार या शाईफेकीला असल्याचं बोललं जात आहे. कारण काँग्रेसच्याच कार्यकर्त्याने थेट अशोक चव्हाणांच्या स्टेजवर चढून शाईफेक केली.

शाईफेकीनंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

अशोक चव्हाण यांनी शाईफेकीनंतर कपडे बदलून पुन्हा सभा घेतली. शिवसेना आणि भाजपला छुप्या पद्धतीने पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीने हे कृत केलं असावं, असा आरोप त्यांनी केला. ते सभेनंतर एबीपी माझाशी बोलत होते. शाईफेक करणारी व्यक्ती कोण होती, याची माहिती मिळाल्यानंतर पुढील भूमिका ठरवू, असं त्यांनी सांगितलं.