मुंबई राज्यातील मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झालेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट लिहली आहे. बाळासाहेबांचा विचार राज्याच्या विकासाचा ध्यास यावर दोन वर्षं पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.  


काय म्हणाले मुख्यमंत्री आपल्या पोस्टमध्ये?


राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे भक्कम पाठबळ लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली.  राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे.


बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकते


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार.


 



राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो


 शिवसेनेच्या भगव्याचे, बाळासाहेबांच्या विचारांचे पावित्र्य राखण्याचे शिवधनुष्य आम्ही यशस्वीरित्या पेलले आहे, याचा सर्वाधिक अभिमान आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा बाळासाहेबांचा मंत्र जपत लोकहिताचा ध्यास घेतला, याचे समाधान आहे. राजकीय वारसा हा केवळ रक्ताने नाही तर कर्तृत्वाने सिद्ध करावा लागतो हे मी आणि शिवसेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत दाखवून दिले. शिवसेनेच्या सर्व पाठीराख्यांनी, मतदारांनी आम्ही घेतलेल्या या भूमिकेला आणि निर्णयाला भक्कम पाठिंबा दिल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी सिद्ध झाले आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा गेले दोन वर्षे सुरू असलेला वादही मिटला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा हा पाठिंबा अधिक भक्कम होईल आणि पुन्हा एकदा महायुती राज्यात दिमाखात सत्तेवर येईल, असा मला विश्वास आहे. सर्वसामान्य माणसाने सरकारवर दाखवलेला विश्वास हीच महायुती सरकारची खरी कमाई आहे.