जळगाव : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 13 दिवसांपासून मनोज जरांगे जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करत आहेत. दरम्यान, यावरूनच माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीला जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांना वेळ आहे, परंतु मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेण्यासाठी त्यांना वेळ नसल्याची टीका ठाकरेंनी केली आहे. जळगाव येथील सभेत ते बोलत होते. 


दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "दिल्लीत जी 20 ची बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तिथे जाण्यासाठी वेळ आहे. पण त्याच मुख्यमंत्र्यांना जालना येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी वेळ नाही. त्यांच्या मागण्या काय आहेत. किमान त्यांच्यासोबत बोला तरी, आम्ही गेलो होतो. जरांगे यांच्यासोबत अजूनही सरकारचा कोणता अधिकृत प्रतिनिधी संवाद साधत आहे का?, एक दाढीवाला गद्दार (अर्जुन खोतकर यांच्यावर टीका) जातोय फक्त." 


हे तर 'जालना'वाला कांड


"मी अंतरवाली सराटी गावात जाऊन आलो आहे. पोलीस देखील माणसं असून, कोरोना काळात त्यांनी आपला जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचवले आहेत. पण, अंतरवाली सराटी गावात उपोषण करणाऱ्या लोकांचे असे काय चुकले होते की, पोलीस आले आणि दणादण मारत सुटले. जसा जालियानवाला कांड झाला होता तसाच हा 'जालना'वाला कांड झाला आहे. अशी राक्षसी वृत्ती महाराष्ट्रात आली कधी," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. 


'इंडिया'च्या बैठकीत मला अध्यक्षपद मिळाले


"सत्ता आली काय आणि गेली काय, मी सत्तेसाठी धडपडत नाही. माझ जीव तुमच्यासाठी आणि देशासाठी जळतोय. मागे आमची इंडिया म्हणून बैठक झाली. त्याचं अध्यक्षपद आमच्या शिवसेनेला (ठाकरे गट) देण्यात आले होते. तिथे देशातील सर्व मोठे नेते आले होते. तिथे मला एक किंमत होती आणि ती तुमच्यामुळे मिळाली. या बैठकीनंतर काही गद्दारांनी होर्डिंग लावले. ज्यात शिवसेनाप्रमुख यांचे फोटो लावून, 'मी शिवसेनेचं काँग्रेस होऊ देणार नसल्याचा' त्यावर लिहले होते. आम्हीपण होर्डिंग लाऊन उत्तर दिले, 'मी शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहू देणार नाही'," असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kopardi Rape Case : सरकारने फाशी दिली नाही, पण देवाने न्याय केला; कोपर्डीतील आरोपी आत्महत्या प्रकरणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया