Sanjay Raut vs Eknath Shinde : खासदार संजय राऊत जामीनावर बाहेर आल्यानंतर पहिल्या दिवासापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलत आहेत. चाळीस बंडखोर आमदार आणि खासदारांना राऊत एकटेच डॅमेज करू शकतात पण शिंदे सेना हा डॅमेज कंट्रोल थांबवण्यासाठी सज्ज आहे. शिंदे ॲन्ड कंपनी राऊतांना जशास तसं उत्तर देण्यासाठी काय आहे नेमका बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्लॅन याबाबत जाणून घेऊयात.
 
खरं तर राऊतांचा जामीन हा शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरलाय. राऊत रोज सकाळी उठणार आणि मीडियाशी बोलणार. त्यात राऊतांच्या निशाण्यावर फक्त आणि फक्त एकनाथ शिदेंच असणार हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळे यापुढे राऊत जे काही बोलतील ते आता शिंदे सेनाही ऐकून घेणार नाही. संजय राऊतांनाही सडेतोड उत्तर देण्याची तयारी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.  संजय राऊत जी भाषा वापरतील त्याच भाषेत उत्तर दिलं जाणार आहे. त्यामुळे राऊतांसाठीही पुढची लढाई सोपी नसणार आहे. एकत्र पक्षात असतानाही राऊत आणि शिंदेचं कधीच जमलं नव्हतं. पण आता तर पक्षात फाटाफूट झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दोन भागात विभागली गेली. जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हाही शिंदेच्या निशाण्यावर राऊतच होते. राऊत आणि इतर सहका-यामुळे पक्षावर ही वेळ आल्याचं कित्येकवेळा बोलून दाखवलं. पण आता राऊतही आणि एकनाथ शिंदेंही दोघेही मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.  


खासदार संजय राऊत यांची भाषा आक्रमक आहे, इतिहासाचे दाखले आणि आपणच बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचं वारंवार सांगत असतात. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊतांची जीभ कधी कधी घसरते. राऊतांच्या तोंडांतून शिव्याची लाखोळी वाहू लागते त्यामुळे हे सगळं ऐकण्याची ना एकनाथ शिंदेंची तयारी आहे ना 40 आमदार आणि खासदारांची आहे. त्यामुळे शिंदेगटाकडून राऊतांचा हिशोब जागेवर चुकता करण्याची तयारी सुरु आहे. सध्या शिंदे गटाचे मुख्यप्रवक्ते दिपक केसरकर आहेत. पण केसरकरांची भाषा आणि देहबोली तशी सौम्य आहे. त्यामुळे संजय राऊतांच्याविरोधात बोलण्यासाठी ग्रामीण भागातल्या खासदारांवर जबाबदारी दिली जाऊ शकते. जो राऊतांचा गावरान भाषेत समाचार घेऊ शकेल. आता राऊतांच्या विरोधात सध्या शिंदेंचे प्रवक्तेच जास्त बोलत आहेत. त्यामुळे ही जबाबदारी शिंदे गटातल्या काही आक्रमक आमदारांवर दिली जाऊ शकते. त्यामुळे जे आमदार खासदार आतापर्यंत राऊतांशी मानसन्मानाने वागत होते, ते मात्र आता डायरेक्ट भिडताना दिसणार आहे.


2019 च्या निवडणुकांनतर संजय राऊतांनी महाविकास आघाडी घडून आणली, त्यानंतर अडीच वर्षातच ही आघाडी कोसळली आणि शिंदे आणि भाजप एकत्र आले. आता संजय राऊत शिंदे-फडणवीस सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न करतील.  एक काळ होता राऊतांच्या निशाण्यावर भाजप होतं. आता भाजपसोबत शिॅदेंचा गट आणि मनसेही असणार आहे. त्यामुळे परिस्थिती बरीच बदलली आहे. त्यात एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे राऊतांना शिंदेच्या विरोधात भाषा नीटच वापरावी लागणार आहे. त्यामुळे राऊतांसमोरही आता पुर्वीसारखं सोपं आव्हान नसणार आहे.