Farmers Agitation : विविध मागण्यांवरुन अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शेतकरी (Farmers) आक्रमक झाले आहेत. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या‌ मतदारसंघात शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढत तहसीलसमोर ठिय्या आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी बैलजोडी, शेळ्या घेऊन तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.  


विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक


राहाता हा राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे. मंत्र्याच्या मतदारसंघातील शेतकरीच विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत शासकीय मदत मिळावी, तसेच पिकविमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी हा बिऱ्हाड मोर्चा काढला. तसेच तहसीलसमोर ठिय्या आंदोलनही केलं. यावेळी शेतकरी बैलजोडी, शेळ्या बरोबर घेऊन आले होते. तहसील कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोरच बिऱ्हाड मांडत चूल थाटली. राजकीय वक्तव्यात व्यस्त असलेल्या सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष‌ द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.




विविध मागण्यांचं तहसीलदारांना निवेदन


यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्यात अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी महसूलमंत्री विखे पाटील यांच्यावर देखील टीका केली. शासनाने आम्हाला जास्त वाट बघायला लावू नये असी विनंती देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली. तसेच या आंदोलनात ज्या विविध संघटनांचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहिले, त्यांचेही शेतकऱ्यांनी यावेळी आभार मानले.




यावर्षी राज्यात अतिवृष्टीमुळं शेती पिकांचं नुकसान 


यावर्षी राज्याच्या बहुतांशी भागात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या पावसाचा शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांना मोठा फटका बसला आहे. शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीच्या फटक्यातून काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. आता ती पिकं देखील संकटात सापडली आहेत. अनेक ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. ऑक्टोबर महिन्यात देखील परतीच्या पावसानं काही जिल्ह्यांमध्ये पावसानं थैमान घातलं होतं. यामुळं देखील शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली होती. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला आहे. यातून देखील काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहे. या पिकांवर आता रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Beed : बीड जिल्ह्यात तुरीवर मर रोगासह पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांची चिंता वाढली