CM Eknath Shinde Birthday : शिवसेना उपनेते तथा माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबई महानगर महापालिकेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे मुंबईसह राज्यात खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज आपला वाढदिवस (Birthday) साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे काल रात्री ठाण्यातील निवासस्थान असलेल्या शुभदीपवर करण्यात आलेली रोषणाई देखील बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. 


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेली रोषणाई देखील बंद करायला सांगितली. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार होती, ती सुद्धा न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील निवासस्थान शुभदीप या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांना मोबाईल फोटो न काढण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. मात्र, तरीदेखील रात्री उशिरापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या वर्षा निवासस्थानी असून, ठाण्यातील निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी कार्यकर्त्यांची दिसून आली. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील शुभदीप या त्यांच्या खाजगी निवासस्थानी अनेक कार्यकर्ते जमा झाले आहेत. या सर्व कार्यकर्त्यांमध्ये मुख्य आकर्षण म्हणून छोटे एकनाथ शिंदे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांची वेशभूषा करून मुख्यमंत्र्यांना थेट शुभेच्छा देण्यासाठी डोंबिवलीहून एक मिनी मुख्यमंत्री देखील दाखल झाला होता. 


फडणवीस शिंदेंची चर्चा...


अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. तर, अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली फडणवीसांनी या सर्व प्रकरणाची पोलिसांकडून माहिती घेतली आहे. तसेच, रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. 


अभिषेक घोसाळकरांचा मृतदेह आनंदनगर परिसरामध्ये...


अभिषेक घोसाळकर यांचा मृतदेह सध्या आनंद नगर, जरी मरी गार्डन दहिसर ईस्ट परिसरात एका इमारतीत जुन्या घरी आणण्यात आलाय. या ठिकाणी कुटुंबीय दर्शन घेतील. त्यानंतर दहाच्या सुमारास त्यांचं पार्थिव विनोद घोसाळकर यांच्या घरी सर्वांना दर्शनासाठी ठेवले जाईल. सध्या आनंद नगर परिसरामध्ये ज्या ठिकाणी मृतदेह आणण्यात आलाय, त्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कुटुंबीयांशिवाय कोणालाही त्या सोसायटीच्या आतमध्ये सोडलं जात नाहीये.


इतर महत्वाच्या बातम्या : 


अराजकता! कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक; अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया