CM Eknath Shinde Aurangabad Tour: माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल देऊन लोकांना वाहतुकीत अडवून ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात औरंगाबाद येथील पैठण (Aurangabad News) दौऱ्यात रस्त्यावरील एसटीच्या बसेस बंद करण्याच्या निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्ती केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री औरंगाबादला पोहोचल्यावर पैठणला जाताना, या दौऱ्यावेळी औरंगाबाद-पैठण रोडवरील एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच गरज पडल्यास पाचोडमार्गे या एसटी बसेस धावतील असाही निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामुळे याचा फटका चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, कारकीन पिपळवाडीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून अनेक विद्यार्थी सुद्धा एसटी बसने प्रवास करतात. त्यामुळे याचा फटका महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा बसणार आहे.
काय म्हटलं आहे आदेशात?
एसटी महामंडळाने काढलेल्या पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजेनंतर पैठणहून औरंगाबादकडे व औरंगाबाद हून पैठणकडे जाणाऱ्या बसेस या मुख्यमंत्री हे पैठण येथे पोहचेपर्यंत अंदाजे 11.30 वाजेपर्यंत बिडकीन मार्गे जाणार नाहीत. प्रवाशी यांना आवश्यकता वाटल्यास त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रवाशी उपलब्धतेनुसार पाचोड मार्गे बसेस पाठविण्याचे निर्णय पैठण स्थानक प्रमुख घेतील व औरंगाबाद येथे असाच निर्णय औरंगाबाद आगार क्र. 2 चे स्थानकप्रमुख हे घेतील.
मुख्यमंत्री अर्ध्या तासात पैठणला कसे पोहोचणार?
एसटी प्रशासनाने काढलेल्या पत्रानुसार मुख्यमंत्री अंदाजे अर्ध्या तासात पैठणला पोहोचतील असा उल्लेख केलेला आहे. मात्र औरंगाबाद ते पैठण दरम्यान मुख्यमंत्री यांचे जागोजागी स्वागत केले जाणार आहे. बिडकीन येथे मोठी रॅली निघणार आहे. त्यातच औरंगाबाद आणि पैठण एकूण पन्नास किलोमीटरचा मार्ग आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अर्ध्या तासात पैठणला कसे पोहोचणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर; असा असणार संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम