CM Eknath Shinde at Maharashtra Winter Assembly Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी आज हिवाळी अधिवेशनात (Nagpur Hiwali Adhiveshan) अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात आमदार हनुमान चालीसा वाचायला बसला तर त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं.त्यांच्या खासदार पत्नीलाही जेलमध्ये टाकलं. पत्रकार अर्णब गोस्वामी आणि राहुल कुलकर्णी यांना जेलमध्ये टाकलं. गिरीश महाजन यांचा पूर्ण कार्यक्रम केला होता. आमच्या सरसकट चौकशा लावण्याचं त्यावेळी पाप केलं होतं. दादा (अजित पवारांना उद्देशून) तुम्ही आम्हाला सांगता की, सत्तेची मस्ती नसावी मग त्यावेळी कोणती मस्ती होती, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला. विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यांत विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, काही न करता तुम्ही लोकांना आतमध्ये टाकलं होतं. सूडबुद्धीने कोणतीही कारवाई हे सरकार करणार नाही. चर्चेमध्ये नक्षलवाद संदर्भात ही उल्लेख करण्यात आले. तीन महिला नक्षल्यांना अटक केली. गृहमंत्री स्वतः पालकमंत्री आहेत. आम्ही राज्यातून नक्षलवाद संपवून टाकणार आहोत, असं ते म्हणाले.
महापुरुषांच्या अवमान करणाऱ्यांसंदर्भात गंभीर चर्चा केली
मुख्यमंत्री म्हणाले की, महापुरुषांचा अपमान केला म्हणून तुम्ही आमच्यावर टीका केली. मात्र शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे कोणी मागितले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र तुम्ही लावू शकले नाही मात्र आम्ही ते लावले. बाळासाहेब ठाकरे यांचंही तैलचित्र लावण्याचं काम आम्ही केलं. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून लोकांना मदत करत आहोत. महापुरुषांच्या अवमानासंदर्भात गंभीर चर्चा केली आहे. कायद्यात काही सुधारणा करता येतील का या संदर्भात ही निर्णय घेतला जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, एनआयटीचा घोटाळा काढला. कुठे बैठका झाल्या हे ही मला माहीत आहे. काय निघालं त्यात.सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न तुम्ही केला. मी हात दाखवायला कशाला जाईल. ज्याला हात दाखवायचा त्याला दाखवला आहे. हे सरकार आपली कालावधी पूर्ण करेल. आम्ही आणि भाजप एकत्र निवडणूक लढवू, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, जिल्हा पातळीवर आम्ही मुख्यमंत्री कार्यालय सुरु करत आहोत. शक्ती कायदा हा केंद्राकडे पाठवला आहे. त्यावर लवकर निर्णय होईल, असंही त्यांनी सांगितलं.
ही बातमी देखील वाचा