पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील वेताळनगर झोपडपट्टीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीला होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल जावयाला विचारणा केल्यामुळे त्याने सासूवर चक्क अॅसिड हल्ला केल्याचं समोर आलं आहे.


 

 

शिवाजी खंडागळे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 30 मे रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती.

 

 

सासरच्या मंडळींकडून मुलीचा मानसिक छळ केला जात होता. त्यामुळे मुलीच्या आईने त्याबाबत जावई खंडागळे याच्याकडे विचारणा केली. मात्र खंडागळेने याचा राग मनात धरुन सासूवर प्राणघातक हल्ला केला. तर आजीला वाचवण्याच्या प्रयत्नात खंडागळेची मुलगीही जखमी झाली आहे.

 

 

या हल्ल्यात मुलगी काजोल थोडक्यात बचावली असून सासूच्या बरगड्या आणि पाठीचा भाग भाजला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.