मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना विरोधकांचा पुन्हा एकदा समाचार घेतला.

 

गेल्या काही दिवसांपू्र्वी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या एका फोटोचा वाद रंगला होता. त्यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी राम शिंदेचा मध्यप्रदेशच्या एका गुंडासोबत फोटोचा ट्विट केला आहे. त्याबाबतच आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार फटकेबाजी केली.

 

तर 'राम शिंदे तुम्ही आता जरा कमी फोटो काढत चला.' असा मिश्किल सल्लाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला.

 


 

नितेश राणेंनी आज राम शिंदे यांचा एक फोटो अपलोड केला आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, मध्यप्रदेशमधील गँगस्टर युवराज खाशिद हा राम शिंदेसमवेत. तो सध्या जामिनावर असून हायकोर्टात त्याच्यावर केस सुरु आहे. याचाच समाचार मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

 

आपण आजकाल फोटोंच्याबाबत बराच हल्लाबोल करतो. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राम शिंदे यांचा बचाव केला.

 

'ठोस पुरावा द्या आणि मगच आरोप करा'

 

'नितेश राणे तुम्ही आज राम शिंदेच्या फोटोबाबत विचाराणा केली. आता कोणीही येतो आणि फोटो काढतो. आपल्याही बऱ्याचदा त्या व्यक्तीबाबत माहिती नसते. फक्त फोटो काढला म्हणून त्या मंत्र्यांवर आरोप करणं चुकीचं आहे. त्या व्यक्तीशी संबंध असल्यास त्याबाबत ठोस पुरावा द्यावा आणि त्यानंतरच आरोप करावा.' असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

'नितेश राणे तुमचाही फोटो कधी, कुठे, कुणासोबत येऊ शकतो.'

 

'आज माझ्या वाढदिवसानिमित्त एका व्यक्तीनं मला फुलांचा गुच्छ भेट दिला. मी देखील तो घेतला. पण मी त्या व्यक्तीला ओळखत नव्हतो. आता हा माणूस दाऊदचा असला तर मला कसं कळेल? (नाही... म्हणजे तो दाऊदचा माणूस नव्हता.) बऱ्याचदा लोक भेटायला येतात तेव्हा तुमच्यासोबत फोटो काढतात. त्यामुळे यावरुन त्या व्यक्तीचे मंत्र्याशी संबंध असतीलच असा अर्थ काढू नये आणि काय आहे ना नितेश राणेजी तुमचेही कधी, कुठे फोटो येऊ शकतात. नाही म्हणजे असं होऊ शकतं ना...' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली.

 

दरम्यान, याचवेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राम शिंदेंनाही मिश्किल सल्लाही दिला. 'राम शिंदे सध्या तुमच्यावर बरंच लक्ष आहे. त्यामुळे तुम्हीपण जरा कमी फोटो काढत जा.'