Sanjay Raut on Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये तातडीने जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आणि अन्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळी उडाली आहे. त्यांच्या भेटीचा तपशील अजून समोर आला नसला तरी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्याकडे तुम्ही स्थापन केलेला गट (शिवसेना) तुमच्यात (भाजप) विलीन करतो, मला पुन्हा एकदा मुख्यमंत्री करा पण हे सांगण्यासाठी गेले होते, असा दावा संजय राऊत यांनी केला. इतकेच नव्हे तर त्यांनी शिवसेना आमदार अडचणीत असल्याने सुद्धा तक्रारी केल्याचं राऊत यांनी म्हटल आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सुद्धा पुन्हा एकदा तक्रार केल्याचा राऊत यांनी दावा केला. 



हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस!


दरम्यान, हे आरोप होत असताना संजय राऊत यांनी आणखी एक आज एक बॉम्ब टाकला. त्यांनी एक व्हिडिओ समोर आणताना संजय शिरसाठ यांना आणखी अडचणीत आणलं आहे. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संजय शिरसाठ एका पैशाच्या बॅगेसह त्यांच्या बेडरूममध्ये बसल्याचे दिसून येत आहे. संजय शिरसाठ बेडरूममध्ये बेडवर बसून सिगारेटच्या झुरके काढत आहेत, तर बाजूलाच दोन बॅगा दिसत आहे. त्यामधील एका बॅगेमध्ये पैशांची थप्पी दिसून येत आहे, तर दुसरी एक बॅग उभ्या असलेल्या स्थितीमध्ये दिसते. यावरून आता 50 खोके एकदम ओके हे ब्रीदवाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून होत आहे तोच एक खोका दिसला का? अशी सुद्धा टीका शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता तो व्हिडिओ ट्विट करत  संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते! स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस! अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रहार केला आहे. हाच व्हिडिओ त्यांनी हिंदीमध्येही पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पीएमओला टॅग केलं आहे. 



हॉटेलसाठी तब्बल 67 कोटींची बोली लावल्याने चांगलेच चर्चेत


गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट हे वादाच्या केंद्रस्थानी आहेत. पहिल्यांदा त्यांनी हॉटेलसाठी तब्बल 67 कोटींची बोली लावल्याने ते चांगलेच चर्चेत आले. यावरून विरोधकांनी घेरल्यानंतर ते बोलीतून बाजूला झाले. आता पुन्हा घरीच पैशांची थप्पी सापडल्यानंतर संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे शिरसाट यांना आयकर विभागाकडून सुद्धा नोटीस आली आहे. या नोटीस संदर्भात बोलताना त्यांनी श्रीकांत शिंदे यांचा सुद्धा नाव जोडल्याने राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, आपण अनावधानाने नाव घेतल्याचे सांगत शिरसाट यांनी श्रीकांत शिंदे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही असं पुन्हा एकदा खुलासा करताना सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून शिंदेंचे आमदार सातत्याने अडचणीत येत आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात केलेल्या बॉक्सिंग स्टाईल  हाणामारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी राज्यभरातून होत असताना दाता संजय शिरसाट सुद्धा नोटांच्या थप्पीमुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.