मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये युती करा, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी काल रात्री उशिरा विशेष बैठक घेण्यात आली. त्यावेळी युतीसंदर्भात भाजपचे पालकमंत्री आणि संघटन मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली.
आगामी दहा महापालिका आणि आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती. शिवसेनेशी कटुता न येता युती करावी अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडली. विशेषत: जिल्हापरिषदेत युती करण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
काही जिल्हा परिषद वगळता भाजप किंवा युतीला निवडणुकांमध्ये फारसे यश कधीच मिळालं नाही. सध्या भाजपसाठी वातावरण अनुकूल आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जिल्हा परिषद ताब्यात याव्या, यासाठी युती करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे. तसंच अशीच भूमिका महापालिका निवडणुकांमध्ये घेण्याचा विचारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवला.
दरम्यान, निवडणुकांबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये अजूनही प्राथमिक बैठक झालेली नाही. त्यामुळे बैठकीसाठी कोण पुढाकार घेतं, युतीचा आग्रह कोणाकडून केला जातो, जागावाटप कसं केलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.