मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले, परंतु प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण मिळवले.त्यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु या काही सेकंदांच्या घटनेदरम्यान हेलिपॅडजवळ उभ्या असलेल्या लोकांना समोर काय घडतंय? याबद्दल काहीच कळत नव्हते.
दरम्यान पायलटने हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवत यशस्वीपणे हेलिकॉप्टर लॅण्ड केले. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचा पीए, अभियंता, पायलट आणि को-पायलट असे पाचजण होते.
अहमदनगर जिल्ह्यातील प्रचारसभा संपवून मुख्यमंत्री पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पावसामुळे हेलिपॅडचा परिसरा काही प्रमाणात चिखलमय झाला असावा. दुपारी साडेचारच्या दरम्यान सुमारे सात टन इतक्या वजनाचे हेलिकाप्टर लॅण्ड झाले. लॅण्डिंगदरम्यान हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे पायलटकडून हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटतंय, असे लोकांना वाटू लागले. मात्र पायलटने वेळीच प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर लॅण्ड केले. लॅण्डिंगनंतर मुख्यमंत्री सुखरुप खाली उतरले आणि पेण येथील भाजपचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले.
दरम्यान, या घटनेबाबत एबीपी माझाने स्थानिक पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याशी बातचित केली. यावेळी पारसकर म्हणाले की, हेलिकॉप्टरचं वजन जास्त असल्यामुळे आणि चिखलामुळे चाकं मातीत रुतली गेली. त्यामुळे हेलिकॉप्टर थोडं डगमगलं, मात्र पायलटने त्यावर नियंत्रण मिळवलं. पायलट्सना अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्याचे ट्रेनिंग असते.