वाशिम : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप युतीचा नगारा वाजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण वाशिममधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगाऱ्याचं वादन केलं.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथे संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात विविध विकासकामांचं भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात दोघांनीही वंजारा समाजाचं पारंपारिक वाद्य नगाऱ्याचं वादन केलं. यावेळी पंकजा मुंडे, रणजीत पाटील, मदन येरावार, संजय राठोड, दादाजी भुसे, भावना गवळी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर भाविकांनी हजेरी लावली.
एकाच गाडीतून प्रवास
दुसरीकडे यवतमाळ इथल्या आजच्या कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीत प्रवास केला. यवतमाळ इथल्या ग्रीन रुमपासून कार्यक्रमस्थळापर्यंत प्रोटोकॉल मोडत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसोबत बुलेट प्रूफ टाटा सफारीत एकत्र प्रवास केला.
ग्रीन रुममध्ये उद्धव ठाकरे यांना भेटायला मुख्यमंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे पोहोचल्या होत्या. परंतु कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा ताफा आणि गाडी सोडून उद्धव ठाकरेंच्या गाडीत बसणं पसंत केलं.
सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी उर्वरित 100 कोटी
वाशिममध्ये संत सेवालाल महाराजांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारलं जाईल, त्यासाठी उर्वरित 100 कोटींचा निधीही लवकरच पुरवला जाईल अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज केली.
तसेच बंजारा बोली भाषा टिकावी म्हणून सरकार प्रयत्नशील असल्याचा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला. बंजारा संस्कृतीच्या संवर्धनासाठी अॅकॅडमी सुरु करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांची यावेळी सांगितलं.