उद्धव ठाकरें यांची आज पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचार सभा होती. तर आज मुख्यमंत्रीही प्रचारासाठी पुण्यात आहेत. त्यामुळे दोन्ही नेते पुणे विमानतळावर एकाच वेळी समोरासमोर आले. पुणे विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये योगायोगानं ही भेट झाली. मात्र, यावेळी दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. पण दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य मात्र केलं. त्यानंतर दोघंही थेट प्रचारासाठी रवाना झाले.
निवडणुकांच्या प्रचार सभांमधून दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पण त्याचवेळी दोन्ही नेत्यांच्या या भेटीमुळे उपस्थितींच्या भुवया मात्र उंचावल्या.
सत्ता स्थापण्यासाठी पुन्हा भाजपसोबत कदापि जाणार नाही : उद्धव ठाकरे
दरम्यान, महापालिका निवडणुकांनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना भाजपसोबत कदापि जाणार नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत स्पष्ट केलं.
सत्तेतून बाहेर पडणार का?
शिवसेनेने भाजपसोबत महापालिका निवडणुकांसाठी जरी काडीमोड घेतला असला तरी युती राज्यात कायम आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर कधी पडणार, हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय. त्यावरही उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.
लाचारी शिवसेनेच्या स्वभावात नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात
सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय आक्रमकपणाने नाही, तर संयमीपणाने घेतला जाईल. आक्रमकपणा आणि संयमीपणाचा ताळमेळ कसा साधायचा ते बाळासाहेबांकडून शिकलेलं आहे. त्यामुळे योग्य वेळ येईल तेव्हा सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असं भाकीत शरद पवारांनी केलं होतं. त्यावरही उद्धव ठाकरे बोलले. पवार भाकीतं करतात म्हणूनच त्यांना ‘पद्मविभूषण’ दिला गेलाय, असा टोला त्यांनी लगावला.
”मुख्यमंत्र्यांवर एकट्यावर प्रचाराचा भार”
मुख्यमंत्र्यांवर एकट्यावर प्रचाराचा भार पडलाय, राज्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही. शिवाय त्यांना मुंबईचा विकास पाहायलाही वेळ नाही. केंद्राचा पारदर्शी कारभाराचा अहवाल न पाहताच ते आरोप करत सुटले आहेत. त्यामुळे त्यांनी एकदा अहवाल पाहावा आणि मग बोलावं, असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी दिला.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी आशिष शेलारांचाही नाव न घेता अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. त्यांना उत्तर द्यायला आमचे शाखाप्रमुखच पुरेसे आहेत, मी त्यावर बोलण्याची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला. शिवाय मुख्यमंत्र्यांसोबत खुल्या चर्चेसाठी आजही तयार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या:
लाचारी शिवसेनेच्या स्वभावात नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात
उद्धव ठाकरे-मुख्यमंत्र्यांची एकमेकांवर टीका, पवारांकडून दोघांचाही समाचार
मध्यरात्री ठाणे मनपा आयुक्तांचा फोन आला, ते घाबरलेले आणि... : मुख्यमंत्री
भाजपची सभाही 'पारदर्शक', कुणीच दिसत नाही, उद्धव ठाकरेंचा टोला
या माफियांनीच मुंबई वाचवली : उद्धव ठाकरे