मुंबई : जानेवारी महिन्यात घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. मात्र, गंभीर खटल्यांच्या बाबतीत समिती निर्णय घेईल. तीन महिन्यात याबाबत पोलीस समितीकडे अहवाल देतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत एकूण 58 गुन्हे दाखल झाले असून, 162 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवाय, जखमींमध्ये 60 पोलीस आणि 58 नागरिकांचा समावेश आहे.

“हिंसाचाराच्या घटनेनंतर एकूण 17 अट्रोसिटी आणि 600 हून अधिक गुन्हे दाखल झाले. त्यात 1199 आरोपींना अटक करण्यात आली असून, 2 हजार 53 व्यक्तींवर प्रतिबंधकात्मक कारवाई करण्यात आली.”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नुकसान किती झाले?

भीमा कोरेगाव प्रकरणात 13 कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले. यासंदर्भात काही ठराविक आकडेवारीही मुख्यमंत्र्यांनी सादर केली. यामध्ये कोरेगाव-भीमा घटनेच्या ठिकाणी एकूण 9 कोटी 45 लाख 49 हजार 95 रुपयांचे नुकसान झाले. याची नुकसान भरपाई झाली. यापैकी दलित समाजाचे एक कोटींहून अधिक, तर मुस्लिम 85 लाखांहून अधिक नुकसान झाले.

राज्य सरकार याप्रकरणी नुकसान भरपाई देईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

संभाजी भिडे-एकबोटेंबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?

भीमा कोरेगाव प्रकरणी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे यांच्यावर निवेदन करणं किंवा वक्तव्य करणं टाळलं. मात्र मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला, फरार झाल्यावर कोंबिंग ऑपरेशन केल्याचे त्यांनी सांगितले.

जिथे जिथे न्यायालयात जामिनासाठी एकबोटे गेले, सरकारने तिथे चांगले वकील नेमत विरोध केला. उलट आम्ही कोठडी मागून चौकशीची मागणी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, संभाजी महाराजांची समाधी राज्य सरकार ताब्यात घेणार असून, त्याची सगळी व्यवस्था राज्य सरकार पाहणार आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

शिवाय, या संपूर्ण प्रकरणात कुणाचीही चूक असो, कठोर कारवाई करु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.