जळगाव : पराभव दिसत असल्याने शरद पवार यांची विवेकबुद्धी संपली आहे. त्यांनी हातवारे केले, आम्ही नटरंगसारखे हातवारे करत नाहीत. 24 तारखेला कळेल कोण खरा पैलवान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या बार्शीतील 'हातवाऱ्यांसह' केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फडणवीस बोलत होते.

यावेळी फडणवीस यांनी बंडखोरी करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांला निवडून आणा, असे देखील आवाहन केले. फडणवीस म्हणाले की, ही मोदींची पहिली सभा आहे. हे एक वादळ आहे, या वादळात काँग्रेस राष्ट्रवादी दोघेही टिकणार नाहीत. कार्यकर्त्यांनी विनवणी केल्यानंतर राहुल गांधी सभा घेत आहेत. लोकसभेसाठी राहुल गांधी यांनी जिथे जिथे सभा केली तिथे पराभव झाला, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस खोटं बोलत नाही, आजवर आकडा मागे घेण्याची वेळ कधीही माझ्यावर आलेली नाही. खान्देशात नारपार, तापीसह इतर पाण्याच्या योजना राबविणार आहोत.  सिंचनाचा बॅकलॉग थांबणार नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये जे जे सांगितले ते ते करून दाखविले असल्याचेही ते म्हणाले.

जळगाव मनपा रसातळाला गेली ती आम्ही वाचवली, असेही ते म्हणाले. दरम्यान भाषणाच्या शेवटी त्यांनी बंडखोरांना देखील चांगलेच सुनावले.  बंडखोरी करणाऱ्यांकडे लक्ष न देता, अधिकृत उमेदवार निवडून आणा, असेही ते म्हणाले.