मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात ज्या भागात भाजपला कमी मतं पडली आहेत त्याठिकाणी भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. याच मोहिमेचा शुभारंभ आज मुंबईतील मुंबादेवी परिसरात करण्यात आला.

मुंबईतील मुंबादेवी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे याच भागात मुख्यमंत्र्याच्या हस्ते भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभानिहाय क्षेत्रात पक्षाला मतं कमी पडली, तिथे भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे.

मुंबादेवी परिसरात भाजप नगरसेवक अतुल शहा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज करण्यात आलं. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप आता छोटे छोटे कार्यक्रम घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभेसाठी युतीचा फॉर्म्युला

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभेत भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 135 जागा लढणार आहेत तर मित्रपक्षांना 18 जागा सोडण्यात येणार आहेत. चंद्रकांत पाटील यांनी हा युतीचा फॉर्म्युला सांगितला.

शिवसेनेच्या आणि भाजपच्या जागा ठरल्या आहेत, त्यामुळे आता केवळ कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महायुतीत रामदास आठवले यांचा रिपाइं, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आणि सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना हे घटकपक्ष आहेत.