कोल्हापूर : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने मुंबई आणि पुण्यामध्ये गायीच्या टोन्ड आणि गोकुळ लाईफ या दुधाच्या दोन प्रकारात प्रतिलीटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात गाईच्या दुधाच्या किमतीत प्रतिलीटर दोन रुपयांनी  वाढ करण्यात आली आहे.


काही दिवसांपूर्वी अमूल दुध संघाने दरवाढीचा निर्णय घेतल्यानंतर आता गोकुळनेही दरवाढ केली आहे. नवी दरवाढ 8 जूनपासून लागू केली जाणार आहे. सध्याचा गायीच्या दुधाचा दर हा 42 रुपये होता. तो आता 44 रुपये इतका झाला आहे.



गोकुळने खरेदी दरात वाढ केल्यानंतर लगेचच विक्रीच्या दरात देखील वाढ केली असल्याचं अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी सांगितलं आहे.

विशेष म्हणजे आज रमजान ईद असल्याने गोकुळ दुधाची विक्रमी विक्री झाली आहे. यावर्षी ईदला सुट्टी असल्याने गेल्या वर्षीपेक्षा 13 हजार लीटर अधिक दुधाची विक्री झाली. गोकुळ दूध संघात विक्रमी विक्री झाल्याची नोंद झाल्याचं अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी सांगितलं आहे.