मुंबई : स्वतंत्र विदर्भासाठीचं आंदोलन महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अधिक तीव्र करण्याची घोषणा विदर्भवादी नेत्यांन केली असताना, मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले, “मी ‘संपूर्ण’ महराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.” ते एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलत होते.

 

 

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागांकडे इतक्या वर्षात म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं. मग आता या भागांना मदत केल्यास टीका का केली जाते? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

 

 

पाणलोट क्षेत्राचा विकास महत्त्वाचा, जागितक बँकेचीही मदत : मुख्यमंत्री

 

 

“जलसंधारणातून पाणलोट क्षेत्राचा विकास करुन विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करणं, हाच दुष्काळमुक्तीसाठी उपाय आहे. आतापर्यंत राज्य सरकारने केवळ पैसे खर्च केले, मात्र पाणलोटाचा विकास झाला नाही. शिवाय, धरणांमुळे दुष्काळमुक्त होऊ शकत नाही, पाणलोट क्षेत्र अत्यंत महत्त्वाचं आहेत. पाणलोट क्षेत्रातील महत्त्वाची कामं करण्यासाठी जागतिक बँकेकडे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला, तो जागतिक बँकेने स्वीकारलाही आहे.”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी ‘माझा कट्टा’वर बोलताना सांगितली.

 

 

मेट्रो कारशेडसाठी आरेबाहेरच्या जागांचीही चाचपणी सुरु : मुख्यमंत्री

 

 

मुंबई मेट्रोसाठी आरेमध्ये कारशेड करणार की नाही, यावरुन वाद सुरु आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मेट्रो सुरु होणं हे मुंबईकरांसाठी अत्यंत फायद्याचं आहे. कारण गाड्यांचे प्रमाण वाढत आहेत. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहेत. त्यामुळे या कारशेडच्या परिसरातील झाडं तोडून इतर ठिकाणी लावणं, योग्य पर्याय होईल की अधिकचा खर्च उचलून रस्ता बदलणं योग्य, याचा मुंबईकरांनीच विचार करावा. मात्र, मेट्रो कारशेडसाठी आरेबाहेरच्या जागांचीही चाचपणी सुरु आहे.”

 

 

विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही: मुख्यमंत्री

 

 

नीट परीक्षा लागू करुन सरकार कुठल्याही स्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. नीट परीक्षा 2018 पासून लागू करा अशी मागणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आहे. यासाठी उद्या सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. इतर राज्यांचाही नीट परीक्षेवर आक्षेप असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

राहुल आवारेला ऑलिम्पिकमध्ये पाठवणारच: मुख्यमंत्री

 

 

“महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेवर अन्याय होऊ देणार नाही. कुस्ती परिषदेतील राजकारणाचा राहुलला फटक बसला असून, त्याला ऑलिम्पिकमध्ये कुठल्याही परिस्थितीत पाठवू.”, असे मुख्यमंत्री फडणवीस ‘माझा कट्टा’वर म्हणाले.