मुंबई : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या काळात महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी व्हिजन मांडलं आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करु, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपतर्फे मुंबई विमानतळावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.


 
महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी सुजलाम सुफलाम महाराष्ट्राचं स्वप्न सर्वांनीच पाहिलं होतं. त्याच दिशेनं सरकार काम करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

 
विदर्भावर आघाडी सरकारकडून अन्याय झाला असं सांगत, तो अन्याय आपण दूर करत असून, मुंबई आणि नागपूरला रस्ते मार्गानं जोडणार, तसंच मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मेट्रोचं मुंबईत जाळं उभारणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

 
मुंबईत सामान्य माणसाला परवडणारी 11 लाख घरं पंतप्रधान गृहनिर्माण योजनेतून घर देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.