सिंचन प्रकल्पाच्या निविदा रद्द, गुन्हे रद्द नाही, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं
एबीपी माझा वेब टीम | 12 Sep 2016 02:21 AM (IST)
नागपूर : गोसीखुर्दसह राज्यातील काही सिंचन प्रकल्पातील निविदा रद्द केल्या तरी त्या गैरव्यवहारांची चौकशी होणारच, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे. निविदा रद्द केल्या म्हणजे गुन्हा रद्द होत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर माजी जलसंपदामंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी 14 पाटबंधारे प्रकल्पांच्या 94 निविदा रद्द केल्या होत्या. त्यामुळे एसीबी चौकशीलाही स्थगिती मिळेल, अशी चर्चा होती. रद्द केलेल्या सर्व निविदा आकडे फुगवुन दिल्या होत्या. म्हणून त्या रद्द करणं क्रमप्राप्त होतं, मात्र निविदा रद्द केल्या म्हणजे गुन्हा रद्द होत नाहीत, गैरव्यवहारांची चौकशी होणारच, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.