मुंबई : मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विविध क्षेत्रातील मराठा समाजातील मान्यवरांसोबत मंथन करणार आहेत. सिनेमा, उद्योग यांसह विविध क्षेत्रातील दिग्गज बैठकीसाठी उपस्थित आहेत.


बैठकीला कोण कोण उपस्थित?

  • डॉ. आ. ह. साळुंखे, ज्येष्ठ विचारवंत

  • नितीन चंद्रकांत देसाई, कला दिग्दर्शक

  • अमोल कोल्हे, अभिनेते

  • सयाजी शिंदे, अभिनेते

  • भैरवनाथ भगवानराव ठोमरे, उद्योजक

  • डॉ. सतीश परब, सुवर्ण कोकण संथा, शेतीपुरक उद्योजक


श्रीमंत शाहू महाराज अनुपस्थित

मराठा आरक्षणपश्नी बोलावलेल्या बैठकीला जाण्यास कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी नकार दिला आहे. आरक्षणावर तोडगा काढणासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांसह इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांना निमंत्रण देण्यात आलं. मात्र मराठा आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर या तिघांनीही बैठकीस जाण्यास नकार दिला.

58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळाल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष्यं केलं.

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतलेली दिसून येते. त्यात आधी मूक मोर्चे काढणाऱ्या आंदोलकांनी ठोक मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आपल्या हालचाली वेगवान केल्या आहेत.