अमरावती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ राहुल कलोती यांचा कामचुकारपणा उघड झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ राहुल कलोती हे प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. सरकारनं चुकूनमाकून दांडीबहाद्दराचा पुरस्कार जाहीर केला तर तो नक्की कलोती सरांनाच द्यावा लागेल. कारण गेल्या 3 वर्षांत फक्त 47 दिवस शाळेत हजेरी लावली आहे. पण तरीही मुख्यमंत्र्यांच्या मामेभावावर अद्याप कुणीही कारवाई मात्र केलेली नाही.
राहुल कलोती... मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ, हे महाशय अमरावती जवळच्या अंजनगाव बारी गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. पण नावाला. कारण, कलोती सरांनी गेल्या 3 वर्षात फक्त 47 वेळा शाळेची पायरी चढली आहे.
पण मग बाकीचे दिवस ते कुठे होते?, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल? राहुल कलोती सर शाळेत येतातच तेच मुळी रजेचा अर्ज घेऊन. त्यानंतर पुन्हा गायब.
पण आता मुख्यमंत्र्यांचेच मामेभाऊ आहेत, म्हटल्यावर कारवाई तरी कशी करणार? त्यामुळे तीन वर्ष ही सगळी मनमानी शिक्षण विभाग सहन करतो आहे.
अंजनगाव बारीत 4 वर्ग आहेत, आणि शिक्षक 3. त्यामुळं एक वर्ग सध्या भगवान भरोसे आहे. तीन वर्षात कलोती सरांवर कारवाईला मुहूर्त न मिळालेल्या गट शिक्षण अधिकारी आता चौकशी सुरु असल्याचं सांगत आहेत. पण मुलांचं नुकसान कोण भरुन देणार? याचं उत्तर त्यांच्याकडे नाही.
'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया', 'कामचोरो की खैर नही' अशा लोकप्रिय घोषणा मोदी आणि फडणवीसांना प्रिय आहेत. तर किमान पोरांच्या तोंडाकडे बघून तरी एकदा राहुल कलोती सरांवरही कारवाईची हिंमत तावडे-फडणवीसांनी दाखवावी म्हणजे झालं.