मुंबई : बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व-विदर्भात १६ ते १७ डिसेंबर रोजी ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. यामुळे अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील.
याचबरोबर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात या दरम्यान पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. या हवामानाच्या स्थितीमुळे पूर्व-विदर्भात धुकं राहील आणि कमाल तापमानात घट होईल.
राज्यातील इतर भागात 15 ते 17 डिसेंबर रोजी काही प्रमाणात आभाळी वातावरण राहील. पूर्व-विदर्भातील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
राज्यभरात थंडीचा कडाका वाढला
राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला पाहायला मिळत आहे. पुण्यात या मोसमातल्या निचांकी तापमानाची नोंद झालेली पाहायला मिळाली. पुण्याचं कालचं तापमान 11 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं होतं. विशेष म्हणजे महाबळेश्वरपेक्षाही पुण्याचं तापमान कमी झालेलं पाहायला मिळालं. मुंबईचाही पारा 18 अंशांपर्यंत घसरला असून शहरात रात्रीच्या थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. फिटनेस प्रेमी मात्र व्यायामासाठी गर्दी करताना दिसत आहेत. नाशिकच्या निफाडमध्ये 10.4 अंश सेल्सिएस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यात हवामान बदललं, दोन दिवसात पावसाची शक्यता
एबीपी माझा वेब टीम Updated at: 15 Dec 2018 08:13 AM (IST)