मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज मोठे निर्णय घेतले आहेत. राज्यातील महानगरांमध्ये जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त सर्व दुकानं आणि कार्यालयं ३१ मार्चपर्यंत बंद राहतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसंदर्भात मोठ्या निर्णयाची घोषणा केली. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची, तर नववी आणि अकरावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर होतील, अशी घोषणा त्यांनी केली. मात्र दहावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (20 मार्च) पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची माहिती दिली. दहावी वगळता सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्याता आले आहेत. दहावीचे दोन पेपर बाकी आहेत. 21 तारखेला इतिहास आणि नागरिकशास्त्र तर 23 तारखेला भूगोलचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील.

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना याआधीच ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून सरकारने आता पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेले तीन प्रमुख निर्णय
- पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द
- नववी आणि अकरावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर
- दहावी वगळता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयं बंद : उद्धव ठाकरे
राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (20 मार्च) जाहीर केलं. रेल्वे, बस बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे तूर्तास रेल्वे आणि बस सेवा बंद होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.