सांगली : अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी करावी, अशी मागणी सीआयडीने केली आहे. सीआयडीने या मागणीबाबतचा एक अर्ज जिल्हा न्यायालयात सादर केला असून, त्यावर लवकरच सुनावणी होईल.


या हत्या प्रकरणात कामटेसह अन्य साथीदारांचे  तोंड उघडण्यात  सीआयडीला आतापर्यंत अपयश आले आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सीआयडी या आरोपींविरोधात अन्य साक्षीदारांचे जबाब आणि भक्कम पुरावे गोळा करत आहे.

दरम्यान, अनिकेतच्या हत्या करण्यात आली की, त्याचा थर्ड डिग्रीत मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे सीआयडीने आता मुख्य आरोपी असलेल्या कामटेची नार्को, ब्रेन मॅपिंगची मागणी केली आहे. मात्र याला न्यायालयाकडून परवानगी मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय आहे प्रकरण?

सांगली पोलिसांनी 6 नोव्हेंबर रोजी थर्ड डिग्रीचा वापर करत अनिकेथ कोथळेला मारहाण केली. मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह जाळून त्याची परस्पर विल्हेवाटही लावली होती. त्यानंतर सिंधुदुर्गातील आंबोली महादेवगड पॉईंटवर पोलिसांनी अर्धवट अवस्थेत जाळून टाकलेला मृतदेह सापडला होता. या हत्येप्रकरणी आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षकासह 12 पोलिसांचं निलंबन झालं आहे.