वाशिम : सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी वाशिमच्या माळेगावात चूलबंद आंदोलन करण्यात आलं. आज (शुक्रवार) सकाळी या गावातल्या एकाही घरात चूल पेटली नाही.
संपूर्ण गावानं उपाशी राहून सरकारचा निषेध करत चक्का जाम आंदोलन केलं. राज्यात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.
सकाळी वाशिम-सेलूबाजार रस्त्यावर चक्काजाम करून आंदोलन करण्यात आलं, राज्यात शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला राज्यातील अनेक घटकांनी आपला पाठिंबा आणि समर्थन दिले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी 1 जूनपासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली या समितीचं काम चालेल. ही समिती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यातील विविध शेतकरी संघटनांशी चर्चा करुन आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल.
मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या या समितीत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा समावेश आहे. ही समिती सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करुन शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
कुठलाही प्रश्न संवादातून सोडवला जाऊ शकतो, त्यामुळे शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. तसंच उच्चाधिकार मंत्रिगटाशी चर्चेतून शेतकऱ्यांनी मार्ग काढावा असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती
दिल्ली हादरली पाहिजे असं आंदोलन करा: राजू शेट्टी
अमरावतीत मुनगंटीवारांच्या गाडीवर कांदे फेकले
सुकाणू समितीच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम
शेतकरी संप देशस्तरावर नेणार: खा. राजू शेट्टी