चंद्रपूर: व्हॉट्सअॅप हे कधी कुणाचा घात करेल आणि कधी कुणाच्या उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. केवळ जोक आणि टाईमपासच नव्हे तर व्हॉट्सअॅपवरुन अनेक समाज उपयोगी कामंही केल्याचं आपण पाहिलं आहे.


चंद्रपुरातही एका व्हॉट्सअॅप ग्रुपने असंच एक कौतुकास्पद काम केलं आहे.

बोन मॅरोशी संबंधित आजारामुळे त्रस्त असलेल्या महिलेला आर्थिक मदत मिळवून देण्याचं काम 'एक हात मदतीचा' या व्हॉट्सअॅप ग्रुपने केलं आहे.

काय आहे प्रकरण?

30 वर्षाच्या निशा मैती यांना बोन मॅरोचा त्रास आहे.  डॉक्टरांच्या भाषेत aplastic  anaemia  किंवा bone marrow failure असं या आजाराचं नाव सांगण्यात आलं आहे.

नाव काहीही असो मात्र या आजारावरील उपचाराचा खर्च तब्बल 14 ते 15 लाख असल्याचं सांगण्यात आलं आहे. दुर्दैव म्हणजे निशाच्या सासरी आणि माहेरी अठरा विश्व दारिद्र्य.

नवरा प्रमोद चंद्रपुरात हातमजुरी करतो तर भाऊ रवींद्र पाटील होमगार्ड आहे. भावाने हलाखीची परिस्थिती असतानाही बहिणीला उपचारासाठी आपल्या घरी आणले.

आतापर्यंत औषध-पाण्यावर 3 लाख खर्च केले, पण कायमचा उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी 14 ते 15 लाखांचा खर्च सांगितला.

रवींद्र पाटीलची ही व्यथा कळताच वरोरा शहरातील छावा ग्रुप या संघटनेचे काही तरुण पुढे आले आणि त्यांनी या आजारी बहिणीला मदत करण्याचा संकल्प केला.

मोठ्या हिमतीन आजारी बहिणीच्या मदतीचा संकल्प केला तरी या ग्रुप मधल्या सदस्यांना त्यांच्या मर्यादांची जाणीव होती. त्यामुळेच आपल्या या बहिणीची व्यथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी "एक हात मदतीचा" या नावाने फेसबुक पेज आणि व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला.

या सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाला मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं. विशेष म्हणजे निशाच्या मदतीसाठी या तरुणांनी एक रॅलीदेखील काढली ज्याच्या माध्यमातून 80  हजारांची रक्कम उभी झाली.

निशाच्या उपचारावर येणारा खर्च हा फार मोठा आहे आणि त्यामानाने सध्या गोळा झालेली 80 हजारांची रक्कम फार तोकडी आहे. त्यामुळे छावा ग्रुपच्या सदस्यांनी आणखी रक्कम गोळा करण्याचा निर्धार केला आहे.  मात्र या निर्धाराला समाजातील दानशूर व्यक्तींची साथ गरजेची आहे.