नाशिक: केम्ब्रिज शाळेचा मुजोरपणा आणखी वाढल्याचं चित्र आहे. कारण आता तर हद्द करत या शाळेने पाचवी ते दहावीच्या 33 विद्यार्थ्यांचे दाखले, थेट पोस्टाने पाठवून दिले आहेत. फी न भरल्याने केम्ब्रिज शाळेने हे पाऊल उचललं आहे.
इतकंच नाही तर या विद्यार्थ्यांना गेल्या 3 दिवसांपासून शाळेत बसूच दिले जात नाही.
याबाबत पालकांनी शाळेविरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. तसंच पालकांनी आज सकाळपासूनच शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
दुसरीकडे या पालकांच्या मुलांनी रस्त्यावरच बसून आजचा टिफीन खाल्ला.
फी न भरल्याने 3 दिवसांपूर्वी दहावीत शिकणाऱ्या 5 मुले आणि 2 मुलींना शाळेने वर्गातून उठवून, घरी पाठवलं होतं. त्यानंतर आजही पाचवी ते दहावीच्या 15 मुलांना शाळेतून काढण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
इतकंच नाही तर या शाळेने आत्तापर्यंत 33 विद्यार्थ्यांचे दाखले पोस्टाने घरी पाठवले आहेत.
याबाबत संतप्त होत पालकांनी दोनच दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये शाळेविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र याचा काहीही परिणाम शाळेवर झालेला नाही.
यावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
शाळेने प्रवेश शुल्कामध्ये फी वाढ केल्याने गेल्या वर्षापासून पालकांचा शाळेविरोधात लढा सुरु आहे. विभागीय शुल्क नियामक समितीपुढे या प्रकरणाची छाननी सुरु असून, निकाल येईपर्यंत मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळेने काळजी घेण्याचं शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आलं आहे. तशी नोटीस शाळेला देण्यात आली आहे.
गुरुवारी शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये बैठक घेण्यात आली. यामध्ये शाळेला पुन्हा एकदा तसे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाकड़ून देण्यात आले असले तरी, शाळा सीबीएससी बोर्ड असल्याने मनपा शिक्षण मंडळाला कारवाई करण्यात अडचणी येत असून, शिक्षण उपसंचालकांकडे याबाबत अहवाल पाठवण्यात आल्याचं महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतय.
शाळेचं स्पष्टीकरण
दरम्यान शाळेकडून वेळोवेळी पालकांना फी भरण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. मात्र तरीही फी भरण्यात न आल्याने शाळेकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.
मागील दीड वर्षापासून जवळपास 200 विद्यार्थ्यांनी फी न भरल्याने, शाळा चालवणे आम्हाला अवघड झाले आहे, असं शाळेचं म्हणणं आहे.
मुलांचं नुकसान
खाजगी शाळांमधील फी वाढीबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांनी निर्देश दिल्यानंतरही शाळांची मुजोरी कायम असल्याचंच यातून दिसून येत आहे. पालक आणि शाळा प्रशासनाच्या या वादात मुलांचं मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्यामुळे या प्रकरणात काय तोडगा निघतोय हे बघणं आता महत्वाच ठरणार आहे.
संबंधित बातम्या
नाशिकमधील केम्ब्रिज शाळेची मुजोरी, दहावीतील 7 मुलांना घरचा रस्ता