New Year Celebration at Tourist Places : नाताळ (Christmas) आणि नवीन वर्षाच्या (New Year 2023) स्वागतासाठी विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची (Tourist Places) गर्दी होताना पाहायला मिळत आहे. लाँग वीकेंड आणि डिसेंबर अखेर असल्यामुळे पर्यटक सुट्ट्यांची मज्जा घेण्यासाठी पर्यटन स्थळांना भेट देत आहेत. लोणावळा, माथेरान यासारख्या थंड हवेच्या ठिकाणाला पर्यटकांची पसंती मिळताना दिसत आहे. यासोबत काही पर्यटक ताडोबाच्या सफारीचा आनंद लुटत आहेत. तर काही पर्यटक तळकोकणात समुद्राच्या सहवासात सुट्ट्या घालवण्यासाठी पोहोचले आहेत.


माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी


ख्रिसमस आणि लाँग वीकेंडनिमित्त रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. माथेरानच्या निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. माथेरान हे मुंबईजवळचं थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतरचा यंदाचा पहिला ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक मोठ्या संख्येनं माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. मुंबई, पुण्यासह देशभरातून पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत.


लोणावळाही पर्यटकांनी गजबजलं


लोणावळा हे स्थळ म्हणजे पर्यटकांची आवडती जागा. थंडी, पावसाळा या ऋतुंमध्ये लोणावळा हे स्थळ गजबजलेलं असतं. इथल्या वातावरणामुळे पर्यटकांना इथे येण्याची ओढ असते. नाताळ आणि न्यू इअरसाठी सध्या लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी बघायला मिळत आहे. वेगवेगळ्या शहरांमधून लोक कुटुंबासह इथे वीकेंडसाठी म्हणून आले आहेत.


मुंबई जवळच्या पालघर समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी


मुंबई,  ठाणे,  नाशिक या महानगरांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमधील पश्चिम किनारपट्टीवरील केळवे समुद्र किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. नाताळ आणि क्रिसमसनिमित्त पालघरमधील केळवे पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. केळवेचा असलेला उथळ, सपाट समुद्रकिनारा आणि याच समुद्रकिनाऱ्यालगत असलेल घनदाट जंगल यामुळे येथील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालतोय. गोवा, अलिबाग ही पर्यटन स्थळ काही प्रमाणात लांब आणि महागडी पडत असल्याने मुंबई, ठाणे , नाशिक येथील पर्यटक सध्या पालघरमधील पर्यटन स्थळांना पसंती देत आहेत .


कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची रेलचेल


कोकणात नाताळ आणि वीकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. तळकोकणातील मालवण, दांडी, चिवला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकाची मोठी गर्दी आहे. पर्यटकांमुळे तळकोकणातील समुद्र किनारे गजबजून गेले असून हॉटेल रेस्टॉरंट हाऊसफुल्ल झाली आहेत. नाताळ आणि वीकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक समुद्र जलक्रीडांचा आनंद लुटत आहेत. त्यासोबतच मालवणी खाद्य संस्कृती सुद्धा आनंद पर्यटक लुट आहेत. डॉल्फिनचे दर्शन देखील मालवण चिवला समुद्रकिनारी पर्यटकांना होतंय. पॅरेसिलिंग, बनाना राइट्स  यासारख्या समुद्र साहसी क्रीडांचा आनंद पर्यटक लुटत आहेत.