BJP Chitra Wagh On Shiv Sena UBT Election Advt : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. जाहीर सभांमधून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असताना आता जाहिरातीवरूनही रणकंदन होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) एका जाहिरातीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल केला भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केला आहे.
आज मुंबईत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषेदत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही चांगलेच तोंडसुख घेतले. चित्रा वाघ यांनी म्हटले की, शिवसेना उबाठा गटाने महिला अत्याचाराच्या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो. अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली असा सवाल त्यांनी केला.
पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?
चित्रा वाघ यांनी म्हटले की, या जाहिरातीमधील कलाकारामुळे महाराष्ट्रातील महिलांची मान शरमेने झुकली आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा समावेश आहे. आदूबाळने याआधीच नाईट लाईफसाठी आग्रह धरला होता. आता, त्यांना पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का, असा सवाल त्यांनी केला. एक पॉर्न स्टार उबाठाच्या जाहिरातीमध्ये झळकतो. त्यांना जाहिरातीसाठी इतर कलाकार मिळाला नाही का, असा प्रश्नही त्याने केला. जाहिरात तयार करणारी कंपनी आणि ठाकरे यांचा काही संबंध आहे का, याचाही तपास करायला हवा असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.
प्रकरण काय?
शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्या जाहिराती तयार केल्या आहेत. एका जाहिरातीमध्ये सरकारला महिला अत्याचारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील कलाकारावर आक्षेप घेत आता भाजपने शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला आहे.