Chiplun News : 22 जुलै हा दिवस आठवला तर चिपळूणकरांच्या अंगावर काटा आणणारा दिवस. त्या दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूणात महापूर आला आणि सारच या महापुरात उध्वस्त झालं. पूर ओसरल्यावर चिपळूणकरांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले. अनेक प्रश्नांना,अडचणींना सामना देत चिपळूणकर कसेबसे सावरत आहेत. त्यात चिपळूणकरांच्या मदतीला आली ती नाम फाउंडेशन संस्था. या संस्थेच्या वतीनं नद्यांचा गाळ दिवसरात्र काढला जात आहे. 


एकीकडे धोधो पडणारा पाऊस तर दुसरीकडे शहरातून वाहणाऱ्या नद्यांना येणारा महापूर. या महापुराचे पाणी शहरात शिरले आणि बघता बघता क्षणांतच सार शहर,वस्ती पुराच्या पाण्यात गेले. पुराच्या पाण्याची पातळी 10 फुट उंच असल्यानं घरं, दुकानं पाण्यात गेली. रात्रभर या पाण्याचा सामना तेथील लोकांना करावा लागला. 


पुराचं पाणी ओसरल्यावर चिपळूणकर एकटवले आणि आपल्या शहरातून वाहणाऱ्या नद्यांचा गाळ काढून टाकावा या मागणीसाठी विविध उपोषण,आंदोलनेही केली. जवळपास महिनाभर या मागणीसाठी चिपळूणकर साखळी उपोषणाला बसले. त्याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. त्यानंतर सरकारला जाग आली आणि सरकारनं गाळ काढण्यासाठी मदत जाहीर केली. ज्या चिपळूणकरांच्या मागण्या होत्या, त्या म्हणाव्या तितक्या पुर्ण झाल्या नाहीत. 2005 च्या पुरानंतर या नद्यांचा गाळ काढलेला नाही. मागणी करूनही गाळ गाळ काढलेला नाही. या नद्यांचा जर वेळेत गाळ काढला असता तर ही परिस्थिती चिपळूणकरांवर आली नसती.


चिपळूणच्या बचावसमितीचे उपोषण सुरु असताना अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशन या संथेनं दखल घेऊन या दोन्ही नद्यांचा गाळ उपसासाठी पुढाकार घेतला आणि स्वतः नाना पाटेकर यांनी 4 जानेवारीला चिपळुणात येऊन गाळ उपसाचा शुभारंभ केला. आज चिपळूणमध्ये शिव नदीचा गाळ काढण्याचं काम दिवस रात्र सुरु आहे. अजूनही या कामासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री वाढवण्यात येणार आहेत. तीन आठवड्यात शिवनदीचा 70 टक्के गाळ उपसा करुन झाला आहे. अनेक वर्ष नद्यांमध्ये साचलेला गाळ काढला जात आहे. त्यामुळे नद्या मुक्तपणे वाहू लागल्या आहेत. चिपळूणात आलेल्या नाना पाटेकर यांनी चिपळूणकरांना आव्हान केलं आहे की, आपणही पुढे या आपण दोघे मिळून गाळ काढुया. आणि चिपळूणला पुरमुक्त करुया. 


यापूर्वी चिपळूणचे लोकप्रतिनिधी गाळ काढण्याचा शुभारंभ करायचे. परंतु नारळ फोडल्यावर दुसऱ्या दिवशी मशिनरी जाग्यावर नसायच्या. नाम संथेचं चार मशिन सध्या गाळ काढण्यासाठी कार्यरत आहेत. नद्यांचा गाळ काढल्यानं नदीकाठच्या रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला आहे. आमच्या घराशेजारी वाहणारी नदी पुर्णपणे गाळानं भरली होती. त्यामुळे पुराचे पाणी नदीपात्राबाहेर येऊन आमच्या घरात पाणी शिरलं. पण आता नाम फाउंडेशननं गाळ काढल्यानं पाणी नदीपात्राबाहेर येण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. 


महामार्गावरील कामथे धरण ते शहरातील वाशिष्टी नदी हे जवळपास साडेसात किलोमीटर नदी पात्रातील गाळ उपश्याचं काम दिवसरात्र सुरु असल्यामुळं येणाऱ्या काही दिवसांत शिवनदी गाळमुक्त झालेली दिसणार आहे. गाळ काढण्याच्या कामाला याआधीच पाटबंधारे विभागानं सुरुवात केली पाहिजे होती. ती न करता सरकारी आदेशाची वाट बघत बसल्यानं चिपळूण आंदोलनाला उतरलं, अशा परिस्थितीत नद्या गाळ मुक्त करण्यासाठी चिपळूणकरांच्या मदतीला नाम फाउंडेशन संस्था आल्यानं नद्या गाळ मुक्त होत आहेत. त्यामुळे चिपळूणकर नक्कीच मोकळा श्वास घेणार यात शंका मात्र नाही. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha