पंढरपूर: आरोग्य विभागाने दिलेल्या लसीकरणानंतर ऐन दिवाळीत परभणी जिल्हयातील दोन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पंढरपुरातही लसीकरणानंतर एका बाळाचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाने बाळ दगावल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पंढरपूर तालुकयातील कौठाळी गावात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दीड महिना ते साडेतीन महिने वयोगटातील १७ बालकाना पेंटा व्हायलेंट, बीसीजीचे लसीकरण केले होते. लहान मुलाना धनुर्वात, डांग्या खोकला अशा आजारापासून बाळांचा बचाव होण्यासाठी ही लस दिली जाते.
कौठाळीतील अंगणवाडीत तीन महिने वयाच्या विराज दत्तात्रय आटकळे या बाळाला काल दुपारी पेंटा व्हायलेंटची लस दिली होती. यानंतर काही वेळाने बाळाला अस्वस्थ वाटत होते. आटकळे कुटुंबियांनी स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. त्यांनी बाळाला आराम पडण्यासाठी एक गोळी दिली आणि त्यातील अर्धी गोळी देण्यास सांगितले. रात्री गोळी दिल्यानंतर झोपी गेलेले बाळ पहाटे उठलेच नाही. बाळाच्या नाकातून रक्त येत असल्याचे आईला दिसले. बाळाची हालचाल थांबल्याने त्यांनी तातडीने पंढरपुरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले असता बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
लसीकरणाचा डोस योग्य न दिल्यानेच आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत विराज चे वडील दत्तात्रय यांनी केला आहे. बाळ मृत झाल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी गावात येण्यास टाळाटाळ केली. यानंतर आई वडीलांसह आणि ग्रामस्थांनी मृत बाळासह पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मृत बाळाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल आणि यानंतर दोषीवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले.
सरकारी लसीकरणानंतर बालकाचा मृत्यू, दोषींवर कारवाईसाठी पालकांसह ग्रामस्थ आक्रमक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Nov 2018 11:23 PM (IST)
रात्री गोळी दिल्यानंतर झोपी गेलेले बाळ पहाटे उठलेच नाही. बाळाच्या नाकातून रक्त येत असल्याचे आईला दिसले. बाळाची हालचाल थांबल्याने त्यांनी तातडीने पंढरपुरातील खाजगी रूग्णालयात दाखल केले असता बाळ मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -