मुंबई : मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णयासाठी महत्वाचे ठरलेल्या हिवाळी अधिवेशनाचे अखेर सूप वाजले. यावेळी विधानसभेत आपल्या भाषणाचा शेवट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवितेच्या माध्यमातून विरोधकांवर फटकारे ओढले.या अधिवेशनात विधानसभेत 11 तर दोन्ही सभागृहात 14 विधेयक पारित झाली. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे.


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यंदाच्या अधिवेशनात विरोधकांनी प्रामुख्याने मराठा आरक्षण, दुष्काळाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये शांततापूर्ण चर्चा आणि प्रसंगी कोपरखळ्या आणि विनोदाचं वातावरण पाहायला मिळालं.

एकीकडे विधानपरिषद सभागृह स्थगित झाल्यानंतर सभागृहाबाहेर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार खेळीमेळीच्या वातावरणात बाहेर पडताना दिसले. दुसरीकडे विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी सगळ्यांचीच दाद मिळवून गेली. विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचा पाढाच सभागृहापुढे वाचला.

मुख्यमंत्र्यांची खास कविता 

माझ्यावर टिकेची करून कामना

विखे पाटील साहेब वाचतात सामना

संघर्ष यात्रेला लाभत नाही गर्दी

म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी

जनता जनार्दन आहे आमच्या बाजूला

म्हणून तुमची खुर्ची त्याच बाजूला

२०१९चा संग्राम आला जवळ

बाजी मारणार सेनेचाच बाण आणि कमळ

-----------------------------------------------

झाला असेल उशीर पण एक लक्षात घ्या

गिरते है शेर-ए-सवार ही मैदान ए जंग में

वो तिफ्ल क्या जानो, जो चलते है घुटनों के बल पे

 

दरम्यान, विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी दाद मिळवत असतानाचा विधान परिषदेमध्ये सभागृह स्थगित झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हास्यविनोद करत बाहेर पडताना दिसले.