मुंबई : कोरोनाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे 25 वर्षापुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये 45 वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत असेही या पत्रात म्हटले आहे.
मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो त्याला लस मिळाल्यास रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. कोरोना परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्र ठोस पाऊले उचलत आहेत याविषयी मुख्यमंत्री पत्रात म्हणाले की, राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून चाचण्याचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे या निर्धाराने आम्ही उपाययोजना करत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक दि चेन या मोहिमेच्या माध्यमातून काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्य पद्धती ठरविली आहे. कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून काल 4 एप्रिल रोजीपर्यंत 76.86 लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. 3 एप्रिल रोजी तर आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे 4.62 लाख जणांना लस दिली.
दीड कोटी डोस मिळावेत
लसीकरण वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच पण त्यासाठी केंद्राने जादा डोस देखील द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या 6 जिल्ह्यांसाठी केवळ 3 आठवड्यात 45 वर्षापुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे , याकरता दीड कोटी डोस मिळावेत. केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.