मुंबई : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन मराठा आरक्षणाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने घेतलं आहे. राज्यात गुंतवणूक देखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली. तसेच त्यांच्याकडून आलेल्या पत्राचा उल्लेख केला. ते म्हणाले की, या पत्रात अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ असे लिहिलं आहे ते हास्यास्पद वाटते. हे पत्र मला की सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेतात त्यांना लिहिले आहे हे कळू द्या, एक पत्र त्यांना देखील लिहा, कोणती अर्वाच्य भाषा ते वापरतात, असा टोला त्यांनी लगावला. 


संभ्रम पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये


दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षाने कसं टिकवता येईल, याच्या सूचना देण्यापेक्षा टीका करत आहेत. ज्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, त्यांचं देखील न्यायमूर्ती शिंदेंच्या माध्यमातून काम सुरू केलं आहे. कायदेशीर बाबी पूर्ण केल्या पाहिजेत. ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षाला आवाहन आहे. आरक्षण दिल्यानंतर तुम्ही सहकार्य केलं पाहिजे, कसं टिकेल याबाबत बोलला पाहिजे. 


कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची असून संयम पाळावा. कायदा हातात घेऊ नये. आंदोलनकर्त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. सरकारने मराठा, ओबीसी समाजासाठी मोठे निर्णय घेतले. धनगर समाज बाबतीत सुद्धा निर्णय आपण घेतला. कोणीही संभ्रम पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये. आरक्षण दिल्यानंतर त्यांना अपेक्षित नव्हतं की इतक्या लवकर आरक्षण मिळेल. त्यांना वाटलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, हिचं त्यांची भावना होती. सरकारने काय केलं नाही ते सांगा, जनता सुज्ञ आहे, तुम्हाला जागा दाखवेल अशी टीका शिंदे यांनी केली. 


अजित पवारांची नाव न घेता जरांगेंवर टीका


दरम्यान, अजित पवार बोलताना म्हणाले की, प्रत्येकाला विरोध करायचा अधिकार आहे, पण आपण काय बोलतो, कोणाला बोलतो, हे बघण्याची गरज आहे. राज्याचे प्रमुख दोनवेळा जालन्यात गेले, नवी मुंबईत गेले. मराठा आरक्षणाचा पृथ्वीराज चव्हाण यांनी निर्णय घेतला होता, देवेंद्रजी यांनी निर्णय घेतला होता, पण आता जाणीवपूर्वक योग्य रितीने सर्व केलेले आहे, पण कोणीही गैरसमज करू नये की काहीही बोलले की खपते, सर्वांना कायदा समान आहे, हे विसरू नये, असा इशारा जरांगे पाटील यांना दिला.  


इतर महत्वाच्या बातम्या