मुंबई :  एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले 118 कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत.  मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर मुंबई सेंट्रल एसटी मुख्यालयामध्ये जल्लोष साजरा करणार आहेत. अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यावेळी उपस्थितीत राणार आहेत. 


पगारवाढ आणि इतर मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी डवळपास सहा महिने संप पुकारला होता. यावेळी संप मिटवण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी वाटाघाटी करण्यात आल्या.  मात्र, त्यानंतरही संप सुरुच होता. याच काळात काही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता. यावेळी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक देखील करण्यात आली होती. त्यामुळे तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार या 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं. शिवाय हल्ल्याप्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या या कमचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा एसटी सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.


आपल्या विविध मागण्यांसाठी 8 नोव्हेंबर 2021 पासून एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संप पुकारला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे राज्यभरातील एसटी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. शिवाय महामंडळाचं देखील कोट्यवधी रूगपयांचं नुकसान झालं होतं.  कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी त्यावेळी राज्य सरकार आणि एसटी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये अनेक बैठका झाल्या. यावेळी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना भरीव वेतनवाढ देखील जाहीर केली होती. कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित आदेशानुसार वाढीव वेतनही मिळाले होते. मात्र, उर्वरित कर्मचारी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावर अडून बसले होते. यातून संप चिघळत गेला आणि एप्रिल महिन्यात काही संपकऱ्यांनी मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानावर हल्ला केला होता. 


शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी काही कर्मचाऱ्यांना अटक देखील करण्यात आली होती. यातील चार आरोपींपैकी दोन आरोपींनी या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्तेंकडे बोट दाखवलं होतं. या हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून सर्व काही केलं ते सदावर्तेंनी केलं अशी कबुली आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली होती. त्यानंर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या आंदोलनाप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यापासून ठाकरे सरकारच्या अनेक निर्णयांना स्थिगित देण्यात आली आहे.  त्यातच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी बदलला आहे.