Chief Minister Devendra Fadnavis : राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा विभाग तयार करीत आहेत. या आराखड्यात लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मानव व वन्य प्राणी संघर्षामध्ये जलद मदत मिळण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करावी
वन्य प्राणी व मानवी संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगातून उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मानव व वन्य प्राणी संघर्षामध्ये जलद गतीने मदत मिळण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करण्यात यावी. या दलातील मनुष्यबळाला उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात यावे. पुढील 100 दिवसांच्या आराखड्यात अशा उपाययोजनांचा समावेश वन विभागाने करावा. वृक्षलागवडीचा संस्कार रूजण्यासाठी ती कायम स्वरूपी अंमलात आणावी. या आराखड्याच्या माध्यमातून लोकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी काम करण्यात यावे असेही फडणवीस म्हणाले.
अन्य राज्यातील अभयारण्यात गरजेप्रमाणे बिबट्या देण्याची व्यवस्था करावी
बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना अन्य राज्यातील अभयारण्यात गरजेप्रमाणे देण्याची व्यवस्था करावी असेही फडणवीस म्हणाले. बिबटे निवारा केंद्रांची क्षमता वाढवण्यात यावी. विभागाने कार्बन क्रेडीट कंपनी स्थापन करण्याबाबत धोरण आणावे. शहरी भागातील वनीकरण वाढविण्यासाठी मियावॉकी वृक्षलागवड पद्धत शहरांमध्ये उपयोगात आणावी. कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्रबिंदू ठेवत योजनांची अंमलबजावणी करावी. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने देशात येणाऱ्या परदेशी विद्यापीठांना आकर्षित करून शैक्षणिक संकुल निर्माण करावे, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी संबंधित विभागाच्या सचिवांनी विभागांच्या आराखड्याचे सादरीकरण केले. बैठकीला संबंधित विभगांचे अधिकारी उपस्थित होते.
सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण, वन व कृषि विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, कृषि विभागाच्या सचिव जयश्री भोज, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, वित्त विभागाच्या सचिव शैला ए आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या: