पुणे : सतिश वाघ हत्या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अगोदर अपहरण झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर एकूण 70 वार करून त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यामुळे अक्षय जावळकर तसेच सतिश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांचा काटा काढल्याचे समोर आले आहे.
अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यात अनैतिक संबंध
सतिश वाघ हत्या प्रकरणातील अक्षय जावळकर या आरोपीचे वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिच्याशी अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधाला अडसर ठरत असल्याने वाघ यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अक्षय जावळकर हा वाघ कुटुंबीयांच्या घरात भाड्याने राहात होता असे समोर आले.
जावळकर कुटुंब वाघ दाम्पत्याच्या घरी भाड्याने राहायला आले
अक्षय जावळकर याचे कुटुंबीय वाघ कुटुंबाच्या घरी गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याने राहायचे. 2001 साली अक्षय जावळकरचे आई-वडील वाघ दाम्पत्याच्या खोलीत भाड्याने राहण्यासाठी आले होते. त्यावेळी अक्षय जावळकरचं वय फक्त 9 वर्षे होतं. सतिश वाघ आणि मोहिनी वाघ यांचा मुलगादेखील अक्षय जावळकरच्याच वयाचा होता. पुढे अक्षय जावळकर आणि वाघ दाम्पत्याच्या मुलाची मैत्री झाली. म्हणजेच अक्षय जावळकर 9 वर्षांचा असल्यापासून त्याचे वाघ दाम्पत्याशी जवळचे संबंध होते.
कित्येक वर्षांपासून होते अनैतिक संबंध
त्यानंतर अक्षय जवळकर 2013 मध्ये 21 वर्षांचा झाला. तेव्हापासून अक्षय आणि मोहिनी वाघ यांची जवळीक वाढली. तेव्हापासून या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यानच्या काळात अक्षय जावळकर सिव्हिल इंजिनिअर झाला. त्याने त्याचा व्यवसायही चालू केला. या काळातही अक्षय आणि मोहिनी यांचे संबंध कायम होते. या सर्व प्रकाराची कुणकुण सतिष वाघ यांना लागली होती.
सतिश वाघ अनैतिक संबंधात ठरत होते अडथळा
पुढे वाघ आणि जावळकर कुटुंबात वाद चालू झाले. त्यामुळे जावळकर कुटुंबाने वाघ दाम्पत्याची खोली सोडली. ते काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या भाड्याच्या खोलीत राहू लागले. मात्र तरीदेखील अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यात अनैतिक संबंध चालू राहिले. मोहिनी वाघ यांना नवरा सतिश वाघ यांच्याकडचे आर्थिक व्यवहार स्वत:कडे घ्यायचे होते. सोबतच सतिष वाघ अनैतिक संबंधाला अडथळा ठरत होते. त्यामुळेच मोहिनी वाघ यांनी अक्षय जावळकरला सांगून सतिश वाघ यांचा काटा काढण्याचे ठरवले.
9 डिसेंबर रोजी अपहरण आणि हत्या
पुढे मोहिनी वाघ, अक्षय जावळकर आणि जावळकरच्या मित्रांनी मिळून सतिश वाघ यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यानंतर 9 डिसेंबर रोजी सतिश वाघ यांचे अपहरण करण्यात आले आणि अवघ्या 15 मिनिटांत त्यांची हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणामुळे पुणे शहर हादरून गेले आहे.
हेही वाचा :