CM Devendra Fadnavis : लग्नात भेटल्यामुळे युती होते किंवा पक्ष जवळ येतात, इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये, ही माझी अपेक्षा असल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याबाबत प्रसारमाध्यमांनी फडणवीसांना विचारलं होते. यावेळी ते बोलत होते. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांची युती होणार का? याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. 


मराठी साहित्य संमेलनासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत सरकार करेल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रयागराजच्या घटनेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, मी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे. मी तेथील सरकारच्या संपर्कात असल्याचे फडणवीस म्हणाले. 


नेमकं काय घडलं होतं?


भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. ठाकरेंसोबत आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते. शुभेच्छा देऊन ठाकरे निघाले असताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील तिथं दाखल झाले होते. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे आमने सामने आले. यावेळी तिथं उपस्थित असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना मग युती कधी? असा प्रश्न विचारला. यावर चंद्रकांत पाटील यांनी मी या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, असं उत्तर दिलं. या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांना नमस्कार केला.


चंद्रकांत पाटील आणि उद्ध ठाकरेंच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा


दरम्यान, आता पुढच्या काळातस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भातील सुनावणी आता 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्या सुनावणीनंतर निवडणुका जाहीर होणं अपेक्षित आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सर्वच प्रमुख पक्षांनी आघाडी करुन लढवल्या असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात नवं राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि उद्दव ठाकरे यांची भेटीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.