Chhattisgarh Accident: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बस्तर येथे निवडणूक ड्युटीवरून परतणाऱ्या सीआरपीएफ (CRPF) जवानांच्या बसचा भीषण अपघात (Accident) झालाय. दंतेवाडा-जगदलपूर मार्गावरील रायकोटजवळ समोरून येणाऱ्या एका लहान वाहनाला वाचवत असताना जवानांची बस नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावर उलटली असल्याची माहिती हाती आलीय. या बसमध्ये एकूण 40 जवान होते. त्यातील 10 जवान गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यापैकी 3 जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही बोलल्या जात आहे. अपघातात जखमी जवानांना जगदलपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांचावर सध्या उपचार करण्यात येत आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील फरासपाल या नक्षलग्रस्त भागात निवडणूक ड्युटी करून सर्व सीआरपीएफ जवान जगदलपूरला परतत होते, त्यादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 


10 जवान गंभीर, तर तिघांची प्रकृती चिंताजनक


हाती आलेल्या प्रथमिक माहितीनुसार, दंतेवाडा-जगदलपूर मार्गावरील रायकोटजवळ, समोरून येणाऱ्या एका लहान वाहनाला वाचवताना सैनिकांना घेऊन जाणाऱ्या बसवर नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर उलटली. या घटनेची माहिती मिळताच जवानांच्या मदतीसाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर सीआरपीएफ कॅम्पचे अनेक जवानही घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी मिळून बसच्या काचा फोडून बसमध्ये अडकलेल्या जखमी जवानांना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी जवानांना टोकपाल आरोग्य केंद्रात नेण्यात आले. जखमी जवानांमध्ये 3 जवान गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.


बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात 


बस्तर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. या सीआरपीएफ जवानांना बस्तरच्या नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर ठेवण्यात आले होते. निवडणूक संपल्यानंतर सीआरपीएफचे सर्व जवान बसने जगदलपूरला परतत होते. येथून ते 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी सुरक्षा पुरवण्यासाठी कांकेर लोकसभा मतदारसंघाकडे रवाना झाले. मात्र रविवारी सकाळी दंतेवाडा येथून सैनिकांना घेऊन जगदलपूरच्या दिशेने निघालेली बस रायकोटजवळ राष्ट्रीय महामार्ग-63 वर अपघातग्रस्त झाली.


गडचिरोलीत पुन्हा नक्षल आणि जवानांमध्ये चकमक


गडचिरोली जिल्ह्यात परत एकदा नक्षली आणि जवानांमध्ये चकमक झाल्याची घटना घडली आहे. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्तही हाती आले असून काही शस्त्रेही पोलिसांनी जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार भैरमगडच्या केशकुतुल भागात ही चकमक झाली आहे. पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी जवान पुन्हा नक्षल विरोधी अभियानाला सुरुवात केली आहे. बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी चकमक अजून ही सुरू असल्याची माहिती दिली आहे.  विशेष म्हणजे 16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यातील आपाटोला जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 29 नक्षल्याना कंठस्नान घातल्यास पोलिसांना मोठं यश आले होते. त्यानंतरही पोलीस अधिक सक्रिय झाले असून या नक्षल्यांचा सोध घेणे सुरू आहे.


इतर महत्वाच्या बातम्या