Chhatrapati Sambhaji Nagar News: गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain Updates) हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, आज (सोमवार 10 एप्रिल) चौथ्या दिवशी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळीच फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार परिसरात पावसाला सुरुवात झाली. तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे देखील आज सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुपारनंतर देखील काही भागांत पावसाची शक्यता आहे. मात्र सलग चार दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असून, शेतकरी हतबल झाला आहे.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान...
आधीच अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे किमान रब्बीच्या हंगामातून काहीतरी हातात येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र आतापर्यंत तीनदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होत असल्याने पिकांचे अतोनात हाल होत आहे. गहू, ज्वारी, मका, कांदे यासह फळबागांना याचा मोठा फटका बसला आहे. आंब्याच्या बागासह इतर बागांना गाराचा फटका बसला आहे. त्यामुळे मोठं नुकसान होत आहे.
वीज पडून चौघांचा मृत्यू...
मराठवाड्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटसह पाऊस पडतोय. त्यामुळे गेल्या चार दिवसात मराठवाड्यातील चार जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा येथील आबादान भिका राठोड (वय 27 वर्षे), परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मांडेवडगाव येथील इंदुमती नारायण होडे (वय 60 वर्ष), बीडच्या आष्टी तालुक्यातील सूरडी गावातील शेतकरी महादेव किसन गर्जे (वय 60 वर्षे), हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील बोरजा येथील पिराजी विठ्ठल चव्हाण (वय वय 33 वर्ष) यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पंचनामे करण्याचे आदेश
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर गेल्या 48 तासांत राज्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडला असून, शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तर राज्यात शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करत असल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. तर यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं जे काही नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले, असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :