Rajarshri Shahu Maharaj : सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य सत्यात उतरवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं कार्य महान आहे.  लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित समाज व्यवस्थेचा आग्रह धरला. अनेक अनिष्ट चालीरीती-प्रथांना पायबंद घातला. शिक्षण, आरोग्य अशा सामान्यांच्या जीवनाशी निगडित क्षेत्रात दूरगामी अशी धोरणे राबविली. त्यांनी कृषी, सहकार, उद्योग या क्षेत्रांच्या विकासासाठी दूरदृष्टीने प्रकल्प, योजना राबविल्या. त्याद्वारेही सामाजिक अभिसरण होईल असे नियोजन केले. त्यांच्या या द्रष्ट्यापणाची फळे आज आपण चाखतो आहोत.  


राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले.  बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम आणि शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) आणि आऊबाई या दोन कन्या झाल्या.


बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.


खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इत्यादी जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.


मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने आणि त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी 26 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील 50% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले.


याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.


अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.


सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेती,  उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली .


शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. 


शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. 


बातमीसाठी माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश